Saturday, 31 August 2013

बोले तैसा चाले त्यांची चातारीत पाऊलें !


आमच्या गावात (चातारी ता.उमरखेड) प्रबोधन कार्यक्रमासाठी अनेकवेळा आलेले प्रा. जैमिनी कडू सर यांच्यावर लिहिलेला हा लेख

बोले तैसा चाले त्यांची चातारीत पाऊलें !

प्रा. जैमिनी कडू सर म्हणजे एक बहुजन विचारवंत. या ठिकाणी सरांच्या बाबतीत जे लिहणार , विश्लेषण करणार ते आम्ही अनुभवलेल्या सरांच्या संदर्भातून असणार आहे. सरांना महाराष्ट्रातील नाही तर भारतातील बहुजन चळवळीतील लोक ओळखतात. परंतु आमचा आणि आमच्या गावाचा सरांशी जो संबंध आला त्या संदर्भात या ठिकाणी विवेचन असणार आहे. आम्ही जे लिहिणार त्यापेक्षा सर फार मोठे आहेत.. बहुजनांना प्रबोधित करण्यासाठी देशभर फिरणारे सर जेव्हा आमच्या गावात सातत्याने येतात. आमच्यासाठी ही फार मोठी बाब आहे. म्हणून आमच्या गावात आलेले सर या ठिकाणी मांडण्याचा हा प्रयत्न...
मूलनिवासी बहुजन समाज आजही गुलामच आहे परंतु याची आम्हाला माहिती नाही. आम्ही गुलाम आहोत आणि त्या गुलामीत आनंद मानत आहोत. याचे कारण काय आहे तर स्वातंत्र्य काय असते याची आम्हाला जाणीवच नाही. या स्वातंत्र्याची आम्हाला खबरच लागू नये म्हणून आपला दुश्मन त्या दृष्टीने कसोशीने प्रयत्नरत आहे. तेव्हा आपल्या समोर हा फार मोठा प्रश्न आहे. गुलामाला प्रथम गुलामीची जाणीव करून द्यावी लागेल आणि नंतर त्यांना स्वातंत्र्यासाठी तयार करावे लागेल.
आज या कामी आपल्या समाजातून काही संघटना प्रयत्नरत आहेत . ‘भारत मुक्ती मोर्चा’, ‘बामसेफ’, ‘मराठा सेवा संघ’ , ‘संभाजी ब्रिगेड’ या काही संघटना बहुजनांना स्वातंत्र्यासाठी तयार करीत आहेत . या साठी काही विचारवंत लोकांना प्रबोधित करून आंदोलनासाठी तयार करण्याचे कार्य करीत आहेत.यात जे कोणी विचारवंत आज ठळकपणे दिसतात त्यात प्रामुख्याने प्रा.जैमिनी कडू सर यांचा उल्लेख करावा लागेल .
गुलामांना स्वातंत्र्यासाठी तयार करणे हे सोपे काम नाही . आज एक तर ज्यांना तयार करावयाचे आहे ते तयार होत नाहीत , तयार करणारांची संख्या मोठी नाही. ज्यांना तयार करायचे ते मुळात तयर करणारांचे ऐकण्याच्या स्थितीत दिसत नाहीत. त्यांच्या डोक्यात दुसरेच भरलेले आहे. एक ही समस्या आणि दुसरी म्हणजे ज्या मालकाचे म्हणजे व्यवस्थेचे सध्या जे गुलाम आहेत त्यांना ही व्यवस्था स्वतंत्र कसे होऊ देतील ? गुलाम स्वातंत्र्यासाठी तयार नाहीत आणि व्यवस्था त्यांना स्वातंत्र्य देणार नाही. एक तर गुलाम म्हणतात की आम्ही गुलाम नाही आणि ही व्यवस्था त्यांचे हे कन्फुजन वाढविण्यात हुशार आहे गुलामाला गुलामीची जानिव करून द्यावी लागेल हे काम तेवढे सोपे नाही तेव्हा या दोघांच्याही रोषाला ,रागाला ओढवून घ्यावे लागते .अशा स्थितीत कार्य चालू ठेवणे हे सोपे काम नाही . या स्थितीत जो न डगमगता कार्य चालू ठेवतो तोच खरा कार्यकर्ता असतो. क्रांतिकारी असतो. या आपल्या आंदोलनात अशा क्रांतिकारी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. ही संख्या वाढविण्यासाठी जे कार्यकर्ता प्रयत्नशील आहेत यात प्रामुख्याने प्रा.जैमिनी कडू सरांचा उल्लेख करावा लागेल.
हे प्रबोधनाचे काम देशभर चालू आहे .ही मालिका सर्वत्र गेली पाहिजे. जिल्ह्यात-तालुक्यात , खेड्या-पाड्यात, तांडा-वस्तीत हे विचार पोहचले पाहिजेत. या साठीच प्रा.जैमिनी कडू देशभर फिरतात. यातूनच सरांचा आमच्या गावाशी संबंध आला. पंधरा-वीस वर्षा पूर्वी आम्ही जसा विचार करत होतो याला सरांच्या विचाराने योग्य वळण दिले आणि आम्ही सरांचे फ्यान झालो. व्यवस्था परिवर्तन करण्याच्या आंदोलनातील आम्ही कार्यकर्ते झालो. आम्ही जे प्रयत्न करायचो त्यात सरांच्या संपर्काने नक्कीच वाढ झाली आहे यामुळे आम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजन करण्यावर जोर दिला आम्ही सातत्याने हे असे कार्यक्रम आयोजित करत आलेलो आहोत.
‘जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा’ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश आपण काटाक्षाने पाळला पाहिजे. यासाठी आमच्या गावात आम्ही सातत्याने कार्यक्रमाचे आयोजन करीत आलो आहे. कार्यक्रमासाठी महाराष्ट्रतील अनेक नामवंत विचारवंतांना आम्ही बोलविले आहे, यात प्रा.जैमिनी कडू सर यांचा सहभाग हा बहुतेक वेळा होता, हे विशेष आहे.
सर आणि आमचे गांव या ऋणानुबंधाची माहिती एका संपादकांना मिळाली आणि सरांवर एक गौरव ग्रंथ काढायचा या उद्देशाने त्यांनी हे सर्व लिहून मागितले परंतु ते काही ग्रंथ काढू शकले नाहीत. तेव्हा आपण तरी हा ग्रंथ काढला पाहिजे असे आम्हाला वाटले म्हणून जुन्या लेखात थोडा फार बदल करून हे पुस्तक रुपाने लिहिले आहे.
आमच्या चातारी गावात झालेल्या कार्यक्रमाची यादी पुढे दिली आहे, यातील अर्ध्याधिक कार्यक्रमाला सरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे त्यावेळी स्वरूप काय होते याची माहिती पुढील तक्त्या मध्ये दिली आहे --
चातारी तालुका उमरखेड येथे झालेले कार्यक्रम
अ.क्र
दिनांक
कार्यक्रमाचे नाव
प्रबोधन सत्राचा विषय
स्थळ
२०/१०/१९९९
बळीराजा स्मृतीदिन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ब्राम्हणीरनातून मूलनिवासी बहुजन  समाजाचे ब्राम्हणीकरण
चातारी
२०/०१/२०००
संविधान सुवर्ण जयंती महोत्सव
राज्य घटनेची सुवर्ण जयंती की शासनकर्त्या जातींनी राज्यघटने सोबत केलेल्या धोकेबाजीची सुवर्म जयंती
चातारी
२८/१०/२०००
बळीराजा स्मृतीदिन
अ] छत्रपती शिवाजी महाराज यांनी वतनदारी पद्धत संपुष्टात का आणली ?
चातारी


ब] काय या देशातील ब्राम्हणवादी पुन्हा मनुस्मुती आणू शकतात ?
चातारी
२७/०३/२००१
इतर कार्यक्रम
देव, दैव, नसीब, धार्मिक कर्मकांड आणि  बहुजनांचे भवितव्य
चातारी
२०/११/२००१
बळीराजा स्मृतीदिन
बहुजन चळवळीपासून बहुजन समाजातील काही घटक दूर आहेत, हा त्यांचा दोष नसून अशी त्यांची मानसिकता बनविणाऱ्या व्यवस्थेचा तो उद्देश आहे.
चातारी
१२/०५/२००२
इतर कार्यक्रम
अंधश्रद्धेची निर्मिती- मानवाची कहाणी
चातारी
२०/११/२००२
बळीराजा स्मृतीदिन
१९४७ च्या स्वातंत्र्याने केवळ ब्राम्हण स्वतंत्र  झाले असून बहुजन समाज अजूनही गुलामच आहे.
चातारी
२०/०१/२००३
जिजाऊ जन्मोत्सव
शिवधर्माची गरज का भासते आहे?
चातारी
१०
२०/०१/२००४
जिजाऊ जन्मोत्सव
शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या  ब्राम्हणवादी सरकारच्या बहुजन विरोधी कटाचा एक भाग आहे.
चातारी
११
१०/११/२००५
बळीराजा स्मृतीदिन
विधायिका ,कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रचार माध्यम सर्वत्र वामन पुत्रांचा प्रभाव असल्याने बळीराजाचा मूलनिवासी बहुजन समाज आजही गुलामच आहे.
चातारी
१२
२१/०१/२००५
जिजाऊ जन्मोत्सव
आम्ही हिंदू धर्माचा त्याग का केला ?
चातारी
१३
२०/११/२००६
बळीराजा स्मृतीदिन
इडा – पीडा टळो, बळीचे राज्य येवो

चातारी
१४
१२/०२/२००६
शिवधर्म परिषद
अ ] वैदिक ब्राम्हणी धर्माच्या मानसिक गुलामितून बाहेर काढून संपूर्ण स्वातंत्र्याचा सन्मार्ग दाखविणाऱ्या शिवधर्माची वर्तमान आवश्यकता आणि एक वर्ष  वाटचालीचे सिंहावलोकन
ब ] एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजे एनटी  आणि यातून धर्मांतरित मुस्लीम, बौद्ध, शिवधर्मीय या सर्वांचे एक आंदोलन निर्माण  झाल्याशिवाय आपल्या स्वातंत्र्याचे आंदोलन सफल होणार नाही.
चातारी
१५
१०/११/२००७
बळीराजा स्मृतीदिन
अ] मूलनिवासी संतांच्या हत्त्या करणाऱ्या ब्राम्हणांचा  आपण मुलाहिजा केल्यानेच पुन्हा ब्राम्ह्नवाद बहुजनांच्या डोक्यावर बसत आहेत.
ब] आम्ही हिंदू धर्माचा त्याग का केला?
चातारी
१६
१७/०१/२००७
जिजाऊ जन्मोत्सव
धर्म परिवर्तन झाले पण विचार परिवर्तन झाले नाही.
चातारी
१७
२०/०१/२००८
जिजाऊ जन्मोत्सव
गुलामांचा आणि गुलाम बनविणाऱ्याचा धर्म एक असूच शकत नाही.
चातारी
२२
१४/१०/२००८
मातंग जाती जागृती सम्मेलन तथा बौद्ध धम्म परिषद
अ] आम्ही हिंदू धर्माचा त्याग का केला?
ब] आम्ही हिंदू धर्माचा त्याग का करीत आहोत.?
चातारी
१८
३०/१०/२००८
बळीराजा स्मृतीदिन
अ] खरंच मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे का ?
ब] ओबीसीच्या आरक्षणाचे खरे विरोधक ओबीसीला समजले नसल्याने त्यांना आरक्षणाचा अजूनही म्हणावा तसा फायदा झाला नाही.,यातून धडा घेऊन मराठ्यांच्या आरक्षणाचे खरे विरोधक ब्राम्हण आहेत हे आम्ही जाहीर करतो.
चातारी
१९
/१/२००९
जिजाऊ जन्मोत्सव
‘ ब्राम्हण म्हणोनी कोण मुलाहिजा करितो ’ : वर्तमान संदर्भात विश्लेषण
चातारी
२०
/११/२००९
बळीराजा स्मृतीदिन
फुले - आंबेडकरी विचारातूनच शोषितांचा विकास शक्य
चातारी
२१
०७/११/२०१०
बळीराजा स्मृतीदिन
छत्रपती शिवाजी राज्यांच्या बदनामीचे षडयंत्र अर्थात जेम्स लेनच्या हाती ‘ कलम ‘ देणारे ‘ कसाई ‘ मात्र भांडारकरी  ब्राम्हण हेच आहेत.
चातारी
आमच्या चातारीत झालेल्या कार्यक्रमाची ही जी सविस्तर माहिती दिली आहे, यापैकी अर्ध्याधिक कार्यक्रमाला कडू सरांची उपस्थिती होती. आम्ही आमच्या गावात प्रामुख्याने
‘ जिजाऊ जन्मोत्सव ’
 ‘ बळीराजा स्मृती दिन ’
आणि ‘ शिवधर्म परिषद ’
या तीन कार्यक्रमाचे आयोजन करत आलो आहोत. हे तिन्ही कार्यक्रम सहसा कोठे होत नाहीत. हे असे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी व्हावेत असे आम्हास वाटते. म्हणून आम्ही तसे आवाहन दरवर्षी करतो. कोणाला अश्या कार्यक्रमाचे आयोजन करायचे असेल त्यांनी विषय किंवा वक्ते या संदर्भात सहकार्यासाठी आमच्याशी सम्पर्क साधावा. असेही आम्ही नेहमी जाहीर करतो. हे असे कार्यक्रम सर्वत्र व्हावेत असे आम्हाला वाटते.
आमच्या या आवाहनाचा परिणाम आज दिसतो आहे. आजकाल हे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी होतांना दिसत आहेत. आमच्यासाठी ही एक चांगली आणि आनंदाची बाब आहे या संदर्भात वेगळे लिहिण्याची आवश्यकता आहे.
चातारीत मान्यवरांची उपस्थिती
वर जी कार्यक्रमाची यादी दिली आहे, जेवढी उपलब्ध झाली तेवढी दिली आहे. काही पत्रिका उपलब्ध झाल्या नाहीत. सर ज्या कार्यक्रमाला नव्हते असे सुद्धा अनेक कार्यक्रम आमच्या गावात झाले आहेत. परंतु बहुतेक वेळा कार्यक्रमाची माहिती सरांना देतो. बऱ्याच वेळा विषय आणि वक्ते या बाबतीतही सरांशी चर्चा करतो. आमच्या दृष्टीस जे विचारवंत पडतात आणि योग्य वाटतात आम्ही त्यांनाच वक्ते म्हणून बोलवितो. सरांनी बऱ्याच वेळा अनेक वक्त्यांची नावे सुचविली आहेत. महाराष्ट्रातील आणि देशपातळीवरील  अनेक विचारवंत मान्यवरांना आम्ही चातारी अनेक वेळा बोलावले आहे. मूलनिवासी बहुजन चळवळीतील बहुतेक कार्यकर्त्यांना आम्ही आमच्या गावात आणले आहे. प्रबोधन करण्यासाठी आंम्ही चातारीत ज्यांना ज्यांना आणले आहे यात प्रामुख्याने मा.पुरुषोत्तम खेडेकर,
मा.प्रभाकर पावडे,
मा.अशोक राणा,
मा.श्रीमंत कोकाटे,
मा.प्रदीप सोळुंके,
मा.गंगाधर बनभरे,
ह.भ.प.मधुकर महाराज बारूळकर,
 डॉ.प्रकाश हसनाळकर,
 मा. व्ही. व्ही. जाधव,
मा. सत्यपाल महाराज,
मा. वैशालीताई डोळस,
डॉ.छायाताई महाले
आशा अनेक मान्यवर वक्त्यांनी आमच्या चातारी गावात येवून प्रबोधन केले आहे.
हे असे कार्यक्रम घेण्याची प्रेरणा मराठा सेवा संघ, बामसेफ, संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चा या सामाजिक संघटनांच्या विचारातून आम्हाला मिळाली आहे. ही प्रेरणा वृद्धिंगत करण्याचे काम सरांच्या सहवासातून आणि सहकार्यातून झाले आहे. आज मूलनिवासी बहुजन समाजाचे खरे मार्गदर्शक हे
मा.पुरुषोत्तम खेडेकर
मा. वामन मेश्राम,
डॉ.आ.ह.साळुंखे
आणि मा.म.देशमुख
हेच आहेत. बहुजन समाजाचा खरा उद्धार कसा होईल याचे मार्गदर्शन या सर्व कार्यक्रमातून आम्हाला मिळाली आहे. ही जाणीव सर्व बहुजनांना व्हावी आणि आपल्या स्वातंत्र्याचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ह्जारो वीर तयार व्हावेत यासाठी आम्ही सातत्याने या अशा कार्यक्रमाचे आयोजन करत आलो आहे. या उद्देशानेच आम्ही आमच्या गावात कार्यक्रमाचे आयोजन करत आलो आहे. आमच्या गावातच नाही तर कधी कधी आम्ही चातारी गावाच्या परिसरातही अश्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात मुळावा, ढाणकी. दिघडी, ब्राम्हणगाव अशा अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
प्रबोधन सत्रांसाठी त्या त्या वेळेनुसार आवश्यक त्या विषयाचे नियोजन करण्यात आले होते. या विषयावर जी चर्चा झाली ती त्यावेळी होणे आवश्यक होती. ही चर्चा करण्यासाठी त्या त्या विषयांतील तज्ञ लोकांना बोलावणे आवश्यक होते म्हणून अशा तज्ञ लोकांना आम्ही प्रत्येक वेळी बोलावले आहे. जास्तीत जास्त सत्य माहिती लोकांना मिळावी म्हणून आमचा हा प्रयत्न असतो. यातून आमच्या गावात आणि तालुक्यात चांगले प्रबोधन झाले आहे. आमच्या गावात ज्यांना ज्यांना काही चांगले ऐकायला मिळाले त्यांनी आपापल्या क्षेत्रात जावून याचा प्रचार प्रसार करण्याचा कार्यक्रम चालू केला याचे काही उदाहरणे आमच्या जवळ आहेत. आम्ही आमच्या गावात ज्याज्या विषयावर चर्चा घडवून आणली ती चर्चा होणे आवश्यक होते अशा नवीन नवीन विषयांवर चर्चा आम्ही घडवून आणली. ही चर्चा ऐकून उपस्थितांनी आपापल्या गावात / विभागात चर्चा घडवून आणली. आम्ही आमच्या गावात जी चर्चा चालू केली ती चर्चा हळू हळू पुढे महाराष्ट्रभर गेली याचा आम्हाला आनंद व अभिमान आहे.
आम्ही ज्या ज्या विषयावर चर्चा घडवून आणली हे विषय आम्ही बामसेफ आणि मराठा सेवा संघ या संघटनाच्या प्रभावातून तयार केले होते किंवा तत्कालीन परिस्थिती नुसार बनविले होते. आम्ही चर्चेसाठी ठेवलेल्या विषयाची श्रोतेच नाहीतर वक्ते सुध्दा नेहमी तारीफ करायचे हे विशेष. चातारीत या विषयावर जी चर्चा झाली ती हळूहळू महाराष्ट्रभर गेली याचा आम्हाला आनंद व अभिमान आहे.
सरांची ओळख :
प्रा. जैमिनी कडू सर ज्यांची ओळख अख्या महाराष्टालाच नाही तर भारतभर आहे, ते कडू सर आमच्या गावात जवळपास बारा वर्षापासून सातत्याने येत आहेत. त्यामुळे सरांची ओळख आख्या गावाला झाली. आमच्या गावातील बहुतेक माणसाला सरांचे नाव माहित आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आम्ही जेव्हा कार्यक्रम ठरवितो तेव्हा ‘सर आहेत ना या वर्षी ?’ अशी लोक विचारणा करतात. अनपढ, शेतकरी सुद्धा सरांची अशीच चौकशी करतात. आमच्या गावातीलच लोक कार्यक्रमाला उपस्थित राहतात असे नाही तर परिसरातील अनेक गावातील नागरिक उपस्थित राहतात. आमच्या तालुक्यातीलच नाही तर तालुक्याच्या बाहेरून, जिल्ह्याच्या बाहेरून असंख्ये लोक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. आमच्या परिसरात सर सर्वांना माहित झाले असून त्यांना ऐकण्यासाठी लोक आवर्जून उपस्थित राहतात. या नेहमी उपस्थित राहणाऱ्या लोकांना सरांना ऐकावेच वाटते. असे काही लोकांनी आम्हाला आवर्जून सांगितले आहे.
बऱ्याच वेळा आम्ही दोन सत्रात कार्यक्रम घेतो. पहिले सत्र झाले की भोजन अवकास असतो. सर्व उपस्थित लोकांच्या भोजनाची व्यवस्था आम्ही करतो. कार्यक्रमाला उपस्थित असण्याऱ्या लोकांना स्वागत कक्षात जावून आपल्या उपस्थितीची नोंद करावी असे आम्ही आवाहन करतो. स्वागत कक्षातील या नोंद वही वरून कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या लोकांचा अंदाज येतो. एका कार्यक्रमाचे उदाहरण म्हणून सांगतो. एका कार्यक्रमाला ८७ गावातील लोकांची  उपस्थिती होती. हे ८७ गावे म्हणजे कमी नाहीत. एवढे लोक आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत आले आहेत, यातही सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचाराचा प्रभाव आहे हे सांगावेच लागेल.
सरांचा पहिला कार्यक्रम :
सरांचा आमच्या गावातील पहिला कार्यक्रम दि. २७ मार्च २००१ रोजी ठेवला होता. आम्ही सरांना इतरत्र ऐकले होते. सरांच्या भाषणाने आम्ही प्रभावित झालो होतो. आपल्या गावातील लोकांना सराना ऐकण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही सरांना आमच्या गावात कार्यक्रमासाठी बोलविले होते. कार्यक्रमाचा विषय होता ‘देव, दैव, नशीब, धार्मिक कर्मकांड आणि बहुजनांचे भवितव्य’. या विषयावर सरांचे आमच्या गावात पहिले भाषण झाले. या कार्यक्रमाला महिलांची संख्या लक्षनिय होती. या कार्यक्रमात सरांनी  सांगितले की जर तुम्हाला देव आहे असे वाटत असेल तर ‘दगड’, ‘धातू’ किंवा ‘कागद’ यात देव नसून तो सजीवामध्ये आहे असे समजा. तो सजीवामध्ये शक्ती निर्माण करतो. या शक्तीचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग झाला पाहिजे. मानवाच्या कल्याणासाठी जे काही असेल ते सर्वच चांगले म्हणावे लागेल. मग मानवाचे कल्याण करणारी जर कोणती व्यवस्थाच नसेल तर काय उपयोग आहे ? आपल्या देशात तर मानवाच्या कल्याणासाठी व्यवस्थाच नाही. सर्वांच्या हिताची व्यवस्था नसून ही काही लोकांसाठीच आहे. देवाच्या नावावर आम्ही खर्च करतो. याचा आम्हाला काही फायदा होत नाही. आम्ही जे खर्च करतो ते सरळ सरळ ब्राम्हणांना फुकट मिळते. परतू याचा आम्ही कधी विचारच करत नाही. ही व्यवस्था आमच्या हिताची नाही तर ती ब्राम्हणाच्या हिताची व्यवस्था आहे, असे स्पष्ट विचार यावेळी कडू सरांनी मांडले होते. या चक्रपाशात आपला समाज अडकून पडला आहे त्याला बाहेर काढणे आवश्यक असल्याचे सरांनी या वेळी सांगितले होते.
सरांचे हे पहिले भाषण आमच्या गावातील लोकांना आवडले होते. कार्यक्रम संपल्यावर अनेक लोकांनी सरांची भेटही घेतली होती. काही लोकांनी तर सरांना काही प्रश्न विचारले, सरसोबत चर्चाही केली होती. एकंदरीत हा कार्यक्रम आमच्या गावातील लोकांना आवडला होता. तेव्हा पासून बऱ्याच लोकांना वाटते की, कोणत्याही कार्यक्रमाला सरांना बोलवावे. आम्हाला अनेक जन भेटतात आणि सरांना बोलवा म्हणून सांगतात, आम्ही सरांना आवर्जून बोलवितो. सर सुध्दा चातारीच्या कार्यक्रमाला आवर्जून येतात. सरांना सुध्दा आमच्या गावाचा लळा लागला असावा. राज्यात आणि देशात मोठ-मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे सर चातारीच्या कार्यक्रमाला मात्र हमखास येतात,
सरांच्या घरी जाण्याची इच्छा :
सर नेहमी आमच्या कार्यक्रमाला येतात. बोलतात. प्रभावित करतात. कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा नेहमी फोनवर सरांशी बोलणे व्हायचे. तेव्हा मला (शिवाजी माने) सारखे वाटायचे की आपण कधी तरी नागपूरला गेलो की सरांच्या घरी जायचे. सरांचा जो आपला परिचय आहे तेव्हा ते घरी आपले जीवन कशा प्रकारे जगतात हे पाहण्याची माझी जिज्ञासा होती. जी समाजात मोठी माणसे आहेत ती घरगुती जीवनात कशी राहतात. हे पाहण्याची माझी इच्छा होती. एक वेळ मी हायकोर्टाच्या कामासाठी नागपूरला गेलो तेव्हा मला वाटले आपण आता सरांच्या घरी गेलो पाहीजे. तेव्हा मी तेथून सरांना फोन केला. ‘सर मी नागपूरला आलो आहे. तुम्हाला वेळ असेल तर मला आपल्या घरी यायचे आहे. ’ मी असे म्हणताच सरांनी विचारले ‘तू आता कोठे आहेस ?’ तेव्हा मी हायकोर्ट परिसरात होतो. सरांनी मला घरी येण्याचा मार्ग सांगितला. सरांनी सांगितल्या प्रमाणे सरांच्या पत्यावर गेलो. मानेवाडा रस्त्यापासून थोडे अंतरावर सरांचे घर आहे. मानेवाडा रस्त्याजवळ मी आलो तर तिथे सर माझी वाट पाहत उभे आहेत, हे पाहून मी अचंबित झालो. एवढा मोठा माणूस माझी वाट पाहत रस्त्यावर थांबतो, ही केवढी मोठी बाब म्हणावी ! ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. माझी वाट पाहत सर थांबले आहेत... खरेच सर मधील माणूस मला त्यावेळी दिसला आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले. तिथून सरांसोबत चालत सरांच्या घरी आलो. माईसाहेबांना माझा परिचय देत सर म्हणाले, ‘हा शिवाजी ’ तर माईसाहेब लगेच म्हणतात ‘शिवाजी माने चातारीचे ’ मला हे ऐकून काय वाटले असेल !
सरांच्या घरी जाऊन मला बऱ्याच गोष्टीचा उलगडा झाला. संत तुकाराम महाराज आणि संत गाडगे बाबांचा वारसा, शाक्त पंताची दिक्षा घेणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदेश कृतीतून मानणारे सर प्रत्यक्षात पाहून मी थक्क झालो. ब्राम्हणी व्यवस्थेने महिलांना अनेक बंधनात अडकवून ठेवले आहे. बांगड्या, मंगळसूत्र, नाकातले आणि कुंकू अशा अनेक गुलामीच्या खुणा मोडून टाकून जीवन जगणारी सरांची पत्नी माईसाहेबांना  पाहून तर मी अवाकच झालो. आजकाल भाषणबाजी करणारे अनेक जन भाषण करतांना सांगतात एक आणि प्रत्यक्षात वागतात वेगळेच. ‘बोलतात तसे वागतात’ असे सर (बापू ) आणि माईसाहेब यांना बघितले आणि विचारासोबत आचरण प्रत्यक्ष अनुभवता आले म्हणून ‘बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पाउले ’ हे अंतकरणाच्या गाभाऱ्यातून सरांबद्दल जाहीर पणे सांगतांना मला आनंद होत आहे. ही पावले अनेक वेळ चातारीच्या भूमीत पडली, त्यांच्या पावलाने ही भूमी खऱ्या अर्थाने प्रबोधित झाली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
उद्याची विद्वान पिढी- धोक्याची सूचना :
आमच्या गावात बोलतांना सरांनी एकदा त्यांच्या नातवाने फोडलेल्या आरश्याच्या काचा त्यानेच जोडल्याचे उदाहरण सांगितले होते. त्या लहानशा पोराला नीट बोलताही येत नव्हते. पण तो काचा जोडण्याचा प्रयत्न करीत होता. हा आधुनिकतेचा, विज्ञानाच्या स्फोटाचा परिणाम आहे. आज टी.वी.,इंटरनेट किंवा नवीन नवीन माध्यमे आली आहेत याचा मुलांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत आहे, असे सांगतांनाच पुढील गोष्ट सांगितली. आज जी १०/१२ वर्षे वयाची मुलं आहेत, ती भयंकर हुशार आहेत. ही एवढी हुशार का आहेत ?हे आपण वर पाहिले आहे. ही जी हुशार/विद्वान पिढी निर्माण होत आहे परंतु पुढे चालून या विद्वान मुलांना त्यांच्या बौद्धिक दर्जा नुसार काम मिळाले नाही तर  अशा वेळी काय होईल ? हा एक फार मोठा प्रश्न आहे. या मुलांना जर त्यांच्या दर्जाचे काम मिळणार नसेल तर फार मोठी समस्या निर्माण होणार आहे. पुढे चालून हे असेच होणार आहे. ज्या मुलांना काही काम मिळणार नाही ती मुले तीन गोष्टी करतील १)आत्महत्या करतील
२)वेडे होतील
३)गुन्हेगार होतील
हे तीन पर्याय आहेत. किती भयानक दिशेने आपण जात आहोत. सरांनी सांगितलेली ही भयानक गोष्ट ऐकून जनता स्तब्ध झाली. खरेच ऐकणारे घाबरले होते. भयान अशी शांतता श्रोत्यांमध्ये पाहायला मिळाली.
खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यामुळे आम्हाला अलगतपणे बाहेर काढून टाकण्याचे षडयंत्र इथे रचले जात आहे. बहुजनांना या प्रक्रियेतून अलिप्त ठेवण्यासाठी वेगवेगळ्या स्थरावर षड्यंत्र केले जात आहेत. “ विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले अन् वित्ता विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्देने केले ” हा शोध राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांनी लावला होता. आता दुष्मनांनी ठरविले आहे की यांना शिक्षणच मिळाले नाही पाहीजे. शिक्षण नाही मिळाले तर यांना अलिप्त पाडणे शक्य आहे, असा डाव खेळला जात आहे. परिणामी दिवसेंदिवस शिक्षण महाग केले जात आहे. जेणे करून आज जे शिक्षण घेऊन पुढे येत आहेत यांना कसे रोकता येईल याचे षडयंत्र चालू आहे. हे आपल्या लोकांना माहित नाही. हे माहित करून देणे आवश्यक आहे म्हणून वेगवेगळ्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे.
बळीराजा स्मृतीदिनाची सुरुवात
आम्ही आमच्या गावात जिजाऊ जन्मोत्सव, शिवधर्म परिषद व बळीराजा स्मृतीदिन हे कार्यक्रम जे आज सातत्याने घेत आहोत या पैकी बळीराजा स्मृतीदिनाची सुरुवात थोडी गमतीशीर आहे. आम्ही सुरुवातीचा कार्यक्रम जो घेतला होता तो बळीराजा स्मृतीदिन म्हणून घेतला नव्हता. दिवाळीत सर्व जन घरी / गावात असतात. ऐकण्यासाठी श्रोते मिळतील या उद्देशाने आम्ही दिवाळीत हा कार्यक्रम घेतला होता. दिवाळीत गावातील लोक तर घरी असतातच याच बरोबर नोकरी निमित्त बाहेरगावी गेलेले गावातील सर्व नोकरदार वर्ग दिवाळीत गावात येतात. ही संधी साधून दिवाळीच्या दिवशी म्हणजे बली प्रतीपदेच्या दिवशी आम्ही आमच्या गावात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात जी चर्चा झाली त्यावरून आमच्या लक्षात आले की आज तर आमच्या बळीराजाचा स्मृतीदिन आहे. वामनाने बळीराजाला कसे संपविले ही गोष्ट आम्हाला समजल्याने वामनाला संपविण्यासाठी अर्थात देशाबाहेर काढण्यासाठी आम्ही बळीराजा स्मृतीदिनाचा कार्यक्रम पुढच्या वर्षा पासून सुरु केला ते अखंड चालू आहे.
ब्राम्हणांचा विरोध :
आपण आपला कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण आपल्या लोकांना तयार करतो. लोकांची संख्या हळूहळू वाढत आहे. आपला कार्यक्रम दिवसेंदिवस वाढतो आहे हे पाहून ब्राम्हणांच्या पोटात दुखू लागले. ब्राम्हणही आपला कार्यक्रम ऐकण्यासाठी येत आहेत. गावातील एक दोन ब्राम्हण ऐकण्यासाठी पेंडॉल मध्ये येऊन बसतात, हे आम्ही पाहिले होते. आम्ही त्यांना हाकलून वगैरे दिले नाही. आम्ही दुर्लक्ष केले परंतु त्यामुळे त्यांचे मात्र फावले. एका ब्राम्हण व्यक्तीने ह्ळूह्ळू विरोध करणे सुरु केले. सुरुवातीला त्या ब्राम्हण व्यक्तीने लोकांना या कार्यक्रमाबद्द्ल उलट-सुलट बाबी सांगायला सुरुवात केली. हे असेच बोलतात. हे काय सत्य आहे का ? असे काहीसे त्याने लोकांना सांगायला चालू केले. बाहेर तो काय–काय बोलायचा, या बद्दल मला जेव्हा माहिती मिळत असे, तरीही मी त्याकडे थोडे दुर्लक्ष केले. पण त्याचा प्रयोग वाढत गेला. एक दिवस जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमात अचानक विचारपीठा जवळ येवून प्रा. जैमिनी कडू सर यांना चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीत काय लिहिले होते ?... पूर्वीची व्यवस्था काय होती त्यावर आता काय चर्चा करता. ते जुने जाऊ द्या. आज ब्राम्हण बदमाश आहेत असे तुम्ही म्हणता ते बरोवर नाही. लोकांना ब्राम्हणांच्या विरुध्द भडकवणे हे बरोबर नाही.... वगैरे–वगैरे असें त्याने चिठ्ठीत लिहिले होते. सरांचे भाषण झाले. मी (शिवाजी माने) ती चिठ्ठी घेतली आणि माईकवर गेलो. मला एवढा राग आला होता की मी आता काय करेल याचा मलाच पत्ता नव्हता. याचा अंदाज माझे मित्र विजय वाठोरे यांना आला असावा. वाठोरे यांनी त्यावेळी मला शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यांना आपला कार्यक्रम विस्कळीत करायचा आहे. आणखी एक प्रबोधन सत्र होणार आहे म्हणून शांत राहून कार्यक्रम सुरळीत पार पाडणे आवश्यक आहे. मी डायसवर गेलो आणि एवढेच म्हणालो की “ तुम्ही ही चिठ्ठी देऊन हुशारी केली, मी तुम्हाला विनंती करतो की, आम्हाला या व्यवस्थेत ठेवले यावर आम्ही नुसते भाष्य करतो, तेही तुम्हाला सहन होत नाही. आमची सहनशीलता संपत आहे हे लक्षात ठेवा. माझ्या मित्रांनी माझ्या बोलण्यावर काही बंधने घातली आहेत.. मी काय करू शकतो ह्याची तुम्हाला चांगली जाणीव आहे. कृपया तुम्ही या कार्यक्रमातून तुमचे तोंड काळे करा उठा आणि गप्प बाहेर जा....” मी असे म्हणताच तो उठला आणि सरळ बाहेर निघून गेला.
ब्राम्हणांचे चरित्र्य आम्ही अभ्यासले आहे
१) स्तुती करणे
२)विरोध करणे
३)हल्ला करणे
हे त्यांच्या कारवाईचे स्वरूप आहे. ब्राम्हण आपली स्तुती करीत असेल तर हमखास समजा की आपले काम चुकीचे चालले आहे. विरोधात बोलत असेल तर समजा की तुमचे काम  बरोबर चालले आहे. हल्ला किंवा मारेकरी पाठविले तर समजा की तुमचे काम अगदी बरोबर चालले आहे. आमच्या कार्यक्रमात खुद ब्राम्ह्नानेच व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा पुढच्या कार्यक्रमासाठी प्रा.जैमिनी कडू सर जेव्हा चातारीला आले तेव्हा याच ब्राम्हणाने ‘माफीनाम’ म्हणून एक चिठ्ठी लिहिली आणि मला कडू सरांची माफी मागायची आहे असे म्हणून मला ती चिठ्ठी सरांना देऊ द्या अशी विनंती केली. त्याने ती चिठ्ठी सरांना दिली. त्याने त्या चिठ्ठीत लिहिले होते, ‘माझ्या हातून जी चूक झाली आहे त्याबद्दल मला माफ करा. अशी चूक मी परत कधी करणार नाही. या नंतर मी तुमच्या कार्यक्रमाला येऊन व्यत्यय आणणार नाही.’ असे त्या चिठ्ठीत त्याने लिहिले होते. तेव्हापासून तो कधी आमच्या कार्यक्रमात पुन्हा नजरेला पडलाच नाही.
ब्राम्हण गेला अन् दलाल आला :
आमच्या कार्यक्रमात वारंवार व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणारा ब्राम्हण गेला. तो आम्हाला पुन्हा आमच्या कार्यक्रमात आढळून आला नाही. परंतु एक–दोन कार्यक्रमानंतर दुसऱ्याच एका मुलांने त्या ब्राम्ह्नाचा चार्ज घेतल्याचे आमच्या लक्षात आले. तो आपलाच पोरगा, शिकलेला परंतु ब्राम्ह्नाळलेला. तो कार्यक्रमात यायचा परंतु कार्यक्रमाच्या विरोधात लोकांजवळ काहीतरी बोलायचा. आमच्या सहकार्यांनी त्याची आमच्याकडे तक्रार केल्यामुळे आम्ही त्याच्या वर नजर ठेवली. एकदा कार्यक्रम संपल्यावर तो सरांना भेटून काहीतरी प्रश्न विचारत होता. सर त्याला माहिती सांगत होते. पण त्याची काहीतरीच बडबड चालू होती. सरांना जेवण्यासाठी जायचे होते. सरांना गाडीत बसून जेवणाच्या ठिकाणाकडे (विजय वाठोरे यांच्या घरी) गाडी पाठविली आणि जेवणाच्या ठिकाणाकडे चालत-चालत चर्चा करतांना मी (शिवाजी माने) त्याला म्हटले, ‘काय विचारायचे ते मला विचार ’ तुझे समाधान नाही झाले तर पुन्हा सरांना विचार. ”  मी त्याला समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आले की, त्याला प्रश्न उत्तरे मिळविण्यासाठी विचारायचे नव्हते. हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा मी एक ‘खाडकन’ त्याच्या कानाखाली वाजविली. तेव्हा तो होश मध्ये आला. आणखी एक दोन लगावल्या तेव्हा रात्रीचे १२ वाजले असतील. तेव्हा आम्ही विजय वाठोरे यांच्या अंगणात होतो. प्रा.जैमिनी कडू सर आणि बरेच कार्यकर्ते छतावर जेवण करत होते. खाडकन लगावल्याचा आवाज वर गेला आणि काय झाले, काय झाले म्हणून पाहण्यासाठी काही जन खाली धावत आले. तो रडत बसला होता. कोणाच्या सांगण्यावरून असे काही करत जाऊ नकोस, असे त्यास सांगितले. तो मुलगा शांतपणे घरी निघून गेला. तोच मुलगा आज शिक्षक आहे .
पुजाऱ्यांच्या पत्राला उत्तर :
प्रा. जैमिनी कडू सरांचा कार्यक्रम झाल्यावर उमरखेड वरून एक पत्र आले. ते होते हनुमान मंदिरातील पुजाऱ्याचे. तो पुजारी आपलाच ओबीसी असावा. परंतु पुरेपूर ब्राम्ह्नाळलेला. अशा लोकांच्या पोटाची व्यवस्था झाली की ते अशी फुकट बडबड चालू करतात. त्याने मला (शिवाजी माने) पत्र लिहिले. त्याने त्या पत्रात लिहिले होते की तुम्ही जे कार्यक्रम घेता. तुम्ही हिंदू नाही का ? तुम्हाला हिदुत्वाचा अभिमान नाही का ?... वगैरे वगैरे. त्याला मी सविस्तर उत्तर लिहून पत्रोत्तर पाठविले. त्या पत्रात लिहिले होते की, ..... हिंदू धर्म अस्तित्वात आहे का? आपण हिंदू धर्मीय आहेत का ? जे ब्राम्हण स्वत:च्या फायद्यासाठी हिंदू शब्दाचा उपयोग आणि प्रयोग करीत आहेत, ते स्वत:ला हिंदू मानतात का ? हिंदू होण्यासाठी कोणता विधी आहे ? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार केला. आपला समाज ज्या ब्राम्हणी धर्माच्या मानसिक गुलामगिरीत अडकलेला आहे. ब्राम्हण आम्हाला बरोबरीचे मानतात का ? ब्राम्हण हे परकीय असून त्यांचा आणि भारतीय मूळनिवासी बहुजनांचा काही संबंध नाही हे डी.एन्.ए. टेस्ट वरून सिद्ध झालेले आहे. तरीही आपण ब्राम्हणी व्यवस्थेच्या फायद्यासाठी काम करत असतो. तरही तुम्ही या साठी एवढा आटापिटा करीत असाल तर मला वाटते तुमची पण डी.एन्.ए. तपासणी करावी लागेल......  असे मी त्या पुजाऱ्याला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. त्या पुजाऱ्याचे पत्र आणि मी त्याला दिलेले उत्तर हे दोन्हीही मी कडू सरांकडे पाठविले होते. सरांनी ते त्यांच्या कुणबी दर्पणच्या अंकात छपले होते.
पुस्तक प्रकाशन कार्यक्रम :
‘आरक्षणातून आलेले लोकप्रतिनिधी’ या पुस्तकाचे प्रकाशन बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम साहेब यांच्या हस्ते नांदेड येथे दिनांक ०२/१२/२००९ रोजी झाले. दुसऱ्याच दिवशी प्रा.जैमिनी कडू सर यांच्या हस्ते पुनर्प्रकाशन कार्यक्रम उमरखेड येथे ठेवला होता. त्या कार्यक्रमात सरांनी भाषणात सांगितले ,” मला हे पुस्तक पुण्यात मिळाले. पुण्याहून नागपूरला येताना रेल्वे प्रवासात हे पुस्तक वाचत होतो. जसा जसा वेळ होत होता तसा-तसा सहप्रवाशांना लाईटचा त्रास होत होता. ते ‘लाईट बंद करा ’ म्हणायचे. मी ‘थोड्यावेळाने करतो ’ असे म्हणायचो. असे करता–करता मी हे पुस्तक वाचून काढले. आज या पुस्तकाचे माझ्या हस्ते पुनर्प्रकाशन होत आहे.” असे सरांनी त्या दिवशी सांगितले. सरांनी बोलून दाखविलेल्या भावना फार महत्वाच्या आहेत. सरांनी पुढे तर या पुस्तकाबद्दल गौरवोद्गार काढले. सर म्हणाले, ‘या पुस्तकाचा अनेक लेखकांना संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग होईल ’ ज्या पुस्तकाबद्दल सर  बोलतात त्या पुस्तकाचा लेखक म्हणून ते माझ्यासाठी फार महत्वाचे होते.
चातारीचा संदर्भ महाराष्ट्रात :
चातारी येथे हे असे कार्यक्रम जे दरवर्षी होत असतात याचा संदर्भ नेहमीच अनेक जन महाराष्ट्रात सर्वत्र देतात. आम्हाला अनेक ठिकाणावरून माहिती मिळाली की चातारीत  होणारे कार्यक्रम फार महत्वाचे आणि नवीन माहिती देणारे आहेत. बळीराजा स्मृती दिन हा कार्यक्रम तर महाराष्ट्रात सर्व प्रथम चालू करणारे आमचे गांव आहे. आता अनेक ठिकाणी बळीराजा स्मृतीदिनाचे कार्यक्रम होत आहेत. अनेक नामवंत वक्ते बोलतांना चातारीचे उदाहरण अनेक ठिकाणी सांगत असतील. ब्राम्हणांनी केलेला विरोध, ब्राम्हणांनी मागितलेली माफी, ब्राम्ह्नाळलेला आपला पोरगा, ब्राम्ह्नाकडून घेतलेला चार्ज, थोबाडीत मारलेली चापट, पुजाऱ्याचे पत्र, पुजाऱ्याच्या पत्राला उत्तर या अशा अनेक गोष्टी आमच्या कार्यक्रमात घडून आलेल्या आहेत.
संभाजी ब्रिगेडचे राज्य अधिवेशनात दि.०५/०५/२००१ रोजी कुर्डूवाडी जिल्हा सोलापूर येथे होते. या अधिवेशनासाठी आम्ही चातारीहून गेलो होतो. महाराष्ट्र भरातून या अधिवेशनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी होती. या अधिवेशनात बोलतांना प्रा.जैमिनी कडू सरांनी चातारीत झालेल्या कार्यक्रमाचा उल्लेख केला होता. ब्राम्ह्नाळलेल्या पोराच्या थोबाडीत मारलेला किस्सा सरांनी आपल्या भाषणात सांगितला होता. सरांनी चातारीचा उल्लेख राज्य अधिवेशानात केला होता. आपल्या गावांत / तालुक्यात येवून गेलेले विचारवंत अनेक वेळ आमच्या गावातील कार्यक्रमाचा संदर्भ इतर ठिकाणी देतात. हे आमच्यासाठी स्फूर्तिदायक आहे.
सरांबद्दल लिहायचे म्हणजे भरपूर आहे. चातारीत आलेले प्रा. जैमिनी कडू सर या विषयावर लिहायचे म्हटले तरीही एक आगळा वेगळा ‘गौरव ग्रंथ’ होऊ शकतो. मूलनिवासी बहुजनांना आता कुठे आपण गुलाम आहोत याची जाणीव होत आहे. ही जाणीव निर्माण करून आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचे आंदोलन उभे करायचे आहे. या साठी आज जे कोणी विचारवंत वक्ते मेहनत घेत आहेत त्यात प्रा. जैमिनी कडू सरांचे स्थान अगदी वरच्या ठिकाणी आहे, हे सर्वांना मान्य करावेच लागते.

लेखक :- शिवाजी माने (संभाजी ब्रिगेड), विजय वाठोरे (बामसेफ)